इडलीवाला अण्णा (@ashutoshab) profile picture

मनातल्या विचारांना डिजिटल रूप देण्याचा प्रयत्न। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। तंत्रज्ञान, आयुष्य आणि शब्दांचे चित्र – CyberSecurity + Life + Everything in Between!

Joined November 2010
Photo by इडलीवाला अण्णा (@ashutoshab)Photo by इडलीवाला अण्णा (@ashutoshab)Photo by इडलीवाला अण्णा (@ashutoshab)Photo by इडलीवाला अण्णा (@ashutoshab)Photo by इडलीवाला अण्णा (@ashutoshab)Photo by इडलीवाला अण्णा (@ashutoshab)Photo by इडलीवाला अण्णा (@ashutoshab)Photo by इडलीवाला अण्णा (@ashutoshab)Photo by इडलीवाला अण्णा (@ashutoshab)Photo by इडलीवाला अण्णा (@ashutoshab)
जाऊ तिथं इडली खाऊ... मी कधीही, कुठेही, केव्हाही, वेळ-काळ-स्थळ- प्रसंग या कशाचीही तमा न बाळगता इडली बिनधास्त खाऊ शकतो... बाहेर असताना मला भूक लागली की पहिला पदार्थ निवडतो तो 'इडली' चायनीजची चमकोगिरी, पाव आणि पुऱ्यांचा उपमर्द या सर्वांच्या पलीकडे मला पांढऱ्या शुभ्र इडलीचा साधेपणाच जास्त आवडतो...
7
4
57
4,584
काल संध्याकाळची वेळ. मी रामकुंडाच्या पायऱ्यांवर बसलो होतो. समोर गोदावरी तिच्या नेहमीच्या संथ लयीत वाहत होती. कुणी पाण्यात दिवे सोडत होतं, कुणी हात जोडून गोदा आरतीची वाट पाहत होतं, मागे कुठेतरी घंटांचा नाद सुरू होता. हे दृष्य रोजचंच, पण आज ते रोजचं वाटत नव्हतं. कारण आज आम्ही हे नाशिक शहर सोडणार आहोत. तीन वर्षांपूर्वी सामान घेऊन आम्ही नाशकात आलो तेव्हा हे शहर आमच्यासाठी नवखं तर होतंच, पण ते अपरिचित, विस्मित करणारं होतं. आज इथून निघताना लक्षात येतंय, आपल्याला घराचा पत्ता बदलता येतो, पण मनात रुजलेलं गाव, तिथली भावनिक गुंतवणूक, ती सोबत नेता येत नाही. खरं सांगायचं तर नाशकात येणं हे आमच्या आयुष्याच्या आराखड्यात कुठेच नव्हतं. एका खास कारणाने, नकळत, अनपेक्षितपणे आम्ही इथे येऊन पोचलो. आपला प्रांत सोडून आपण नाशकात राहावं असं कधी खिजगणतीतही नव्हतं, स्वप्न पाहणं तर दूरच. आयुष्य कधी कधी असं हात धरून एखाद्या अनोळखी गावी नेऊन सोडतं, आणि आपण कायमचेच त्या गावचे होऊन जातो. आम्ही नाशकात आलो तेव्हा मनात बरीच धाकधूक होती. नवं शहर, नवी माणसं, नवे रस्ते, नवा दिनक्रम. भाजी कुठे चांगली मिळते, दूध कोण घालणार, रस्ता चुकलो तर विचारायचं कुणाला, असले छोटे छोटे प्रश्न मोठे वाटायचे. पण आम्ही इथे आलो आणि कधी एकदाचे इथले झालो, ते कळलंच नाही. ज्या रस्त्यांवर पहिल्यांदा गुगल मॅप लावून फिरलो होतो, त्याच रस्त्यांवरून आता आजन्म इथेच राहत असल्याच्या आविर्भावात कुणाला पत्ता सांगायला लागलो. एक काळ होता, जेव्हा नाशिक म्हणजे मुंबईला जाताना लागणारं एक स्टेशन. रेल्वेच्या खिडकीतून दिसलेली दोन मिनिटांची गर्दी. किंवा खूप पाऊस झाला आणि पुरात दुतोंड्या मारुती बुडाला, अशी वर्तमानपत्रात वाचलेली एखादी बातमी. एवढ्यापुरताच नाशिकशी आपला काय तो संबंध. पण आता नाशिक ही लांबची गोष्ट राहिली नाही. तो दुतोंड्या मारुती, तो रामघाट, ती पंचवटी, काळारामाच्या मंदिरातली आरती हा माझा रोजचा विषय झाला होता. पावसाळ्याच्या बातमीतला मारुती आता शेजारचा वाटू लागला होता. आणि इथले ऋतू... त्यांची तर बातच न्यारी. पावसाळ्यात आभाळ असं कोसळायचं, की वाटायचं आता थांबणारच नाही. गोदा दुथडी भरून वाहू लागायची, घाटावरच्या पायऱ्या एकेक करत पाण्याखाली जायच्या, आणि अख्खं गाव पूर बघायला लोटायचं. त्र्यंबकच्या डोंगररांगा पावसाळ्यात हिरवी शाल पांघरून बसायच्या, तर इथले परिसर हिरवाईने असे नटायचे की नजर हटू नये. मग हिवाळा यायचा. कधी हलक्या धुक्यात बुडालेली सकाळ, अलगदच बोचणारी थंडी, आणि थंडीत वाफाळता चहा घेण्याची मजा कुठे घ्यावी तर ती नाशिकलाच! आम्ही मराठवाडा, तेलंगणात राहिलेली माणसं. आम्हाला उजाड माळरानं बघायची सवय. पिवळट तपकिरी जमीन, तळपतं ऊन, कुठेतरी एकटंच उभं असलेलं बाभळीचं झाड हेच आमचं निसर्गचित्र. हिरवा रंग आमच्यासाठी पावसाळ्यातला चार महिन्यांचा पाहुणा. पण नाशकात तो हिरवा रंग पाहुणा नव्हता, घरचाच माणूस असल्यागत तो इथे वावरतो. हिरव्याच्या रंगाच्या निसर्गाला इतक्या छटा असतात हे मला इथे आल्यावर कळलं. नाशिकच्या या हिरवाईने जणू मला आयुष्याचे रंग शिकवले.! या सगळ्यांनी आयुष्यात एक वेगळीच बहार आणली. नाशिक जणू एक वेगळीच दुनिया आहे. इथे देवही गावकऱ्यासारखा भेटतो आणि गावकरीही देवासारखा. इथे सकाळ मंदिरांच्या घंटांनी उजाडते आणि संध्याकाळ गोदेच्या आरतीने मावळते. नाशिकने आम्हाला पुरतं आपलं करून घेतलं. कधी, कसं, ते कळलंच नाही. आणि आता... इथून पाय निघत नाही.! एव्हाना अंधार दाटला होता. लोकांनी सोडलेले ते पाण्यावरचे दिवे हळूहळू पुढे सरकत होते. गोदेकडे पाहिलं आणि वाटलं, तीही तर रोज हेच करते. ती आकस्मिक या गावी येते, क्षणभर विसावते आणि त्या क्षणापुरती या घाटाचीच होऊन जाते. मग क्षणात घाटाचा निरोप घेते आणि पुढच्या गावाला भेटीला निघते. ज्या घाटावर ती क्षणभर विसावते, घटकाभराचा तो घाटच तिची कायमची ओळख बनतो. तिला तो घाट सोडवत नाही, आणि पुढच्या गावच्या भेटीची ओढही सुटत नाही. मलाही आता नाशिक असंच सोडावं लागणार आहे. ते सुटत नाही, पण सोडावं तर लागणारच. पुढच्या गावी मी जाणार तो नाशिककर म्हणूनच. सोबत नेतोय थोडी इथली थंडी, थोडा इथला पाऊस आणि ओंजळभर आठवणी. परतीच्या वाटेवर शेवटचं एकदा मागे वळून पाहिलं. गोदा तिच्याच लयीत वाहत होती. तिला उद्देशून मनात एवढंच उमटलं... निघालीस तू पुढल्या या गावां... – आशुतोष
27
20
2
188
6,411
आज सकाळी सकाळी अनेक कॉर्पोरेट कार्यकर्ते आनंदात असतील, रात्रीपासूनच मायक्रोसॉफ्टच्या सर्विस बंद आहेत, ईमेल बंद आहेत, अनेकांचे टीम्स बंद आहेत... अवघा आनंदी आनंद....
8
4
1
120
4,640
अनारसे हा पदार्थ नसून ती परीक्षा आहे असंच म्हणावं लागेल. तांदूळ भिजवा, वाळवा, कुटा, गूळ मिसळा, मुरू द्या... आणि तळताना कढईत विरघळला तर पुन्हा पहिल्यापासून हे सगळं करा... ज्या घरात अनारसे व्यवस्थित जाळीदार होतात त्या घरच्या गृहिणीने एखादा स्टार्टअप सुरू करायला हरकत नाही. संयम, सहनशीलता, प्रयोगशीलता, अपयश पचवणं या सगळ्या परीक्षा पार करून त्या गृहिणीने ते अनारसे बनवलेले असतात. #फराळ
1
4
68
1,524
इडलीवाला अण्णा retweeted
दिवाळी आहे,चार दिवस जरा राजकारण,समाज,धर्म,मराठी बोला वगैरे नेहमीचे टेक्निकल विषय सोडून काहीतरी हलकंफुलकं खुसखुशीत #फराळ ट्विट करूया का?
6
26
5
57
फेसबुकवर Abhijit W (अभिजित वाघमारे) यांचे अकाउंट आहे. रस्ते सुरक्षा विषयावर त्यांचे अनुभव आणि त्या संबंधित इतर विषयांवर त्यांच्या पोस्ट असतात. त्या पोस्ट वाचताना रस्ते सुरक्षेचे अनेक पैलू उलगडत जातात. वाहतूक नियमांच्या पलीकडे जाऊन अपघात कसे घडतात, त्यांचे परिणाम काय होतात, अशा अनेक बाजू यातून समजतात. नेहमीच्या फीडमध्ये काहीतरी वेगळं, आणि खऱ्या अर्थाने कामाचं वाचण्यात आलं. ते समृद्धी महामार्गावर रस्ते सुरक्षा अधिकारी म्हणून काम पाहतात. त्यांच्या कामाबद्दल आज त्यांची प्रशंसा होत आहे, आणि ती योग्यच आहे. दिवसेंदिवस समृद्धीचा वापर वाढत आहे. दिवाळीच्या आधी आणि नंतर तर समृद्धी महामार्गावरची वाहतूक अनेक पटींनी वाढते. माझ्यासारखे जे समृद्धीवर नेहमी प्रवास करतात, त्यांना इथल्या प्रकारांची तोंडओळख असते. पण जे वेळप्रसंगी, क्वचितच या रस्त्याने प्रवास करतात, त्यांनी एकदा तरी या प्रोफाइलवर नजर टाकावी. समृद्धी सरळ आहे, रुंद आहे, गुळगुळीत आहे... आणि म्हणूनच फसवा आहे. समोर मोकळा रस्ता दिसला की पाय आपोआप ॲक्सिलरेटरवर दाबला जातो. तासन्तास एकसुरी प्रवासात डोळ्यांवर झोप कधी चढते ते कळतही नाही. अपघात एका क्षणात होतो, पण त्याचे परिणाम एका कुटुंबाला आयुष्यभर भोगावे लागतात. प्रवासाला निघण्याआधी पाच मिनिटं काढून त्यांच्या काही पोस्ट वाचा. गाडी कशी चालवायची हे आपल्याला माहीत असतं, पण रस्ता काय करू शकतो हे तिथे रोज उभ्या असणाऱ्या माणसालाच जास्त ठाऊक असतं. लवकर पोहोचण्यापेक्षा, सुखरूप घरी पोहोचणं महत्त्वाचं.!
3
1
21
1,011
घरी पोचल्यावर मेसेज कर, येताना दूध घेऊन ये, अंघोळीनंतर कपडे मशीनला लाव अशी मोक्याच्या क्षणी करायची कामगिरी माझ्यावर सोपवलेली असते आणि नेमकं मी या गोष्टी कधीच लक्षात ठेवू शकत नाही, ती कामगिरी बजावायचं हमखास विसरतो. या गोष्टी लक्षात ठेवून करणारा किंवा माझ्याकडून करून घेणारा एआय मला हवा आहे. म्हणजे कसं मी घरी पोचलो की त्याने मेसेज करून टाकावा, अंघोळ झाली की त्यानेच कपड्यांची आठवण करावी. हे असलं युद्धपातळीवरचं काम करणार असेल तर त्याला एआय म्हणण्यात अर्थ आहे. बाकी ते चॅट बीट वाले एआय .. अतिसामान्य!
6
1
32
2,715
आपला समृध्दी महामार्ग बनवलेल्या अभियंत्यांनी आयुष्यात किमान एकदा तेलंगणातून NH४४ वरून प्रवास करून पहावा. कदाचित पुढचा एखादा रस्ता बनवताना,तो गुळगुळीत बनवता येतो हे लक्षात घेता येईल...
21
36
2
401
10,478
ई-मुद्रा! काल पासून बातम्यांमध्ये हे नाव ऐकून हा तांत्रिक गोंधळ नीट उमगला नाही, त्यांच्यासाठी ही सोपी माहिती. आपण संगणकावर कुठलीही वेबसाइट उघडली तर डाव्या बाजूला कोपऱ्यात एक कुलूपाचे चित्र दिसते, ते हिरवे असेल तर समजते की हे संकेतस्थळ सुरक्षित आहे. हे फोनच्या ब्राऊजरमध्येही बघता येते. एखाद्या बँकेचे संकेतस्थळ उघडून बघा. हे हिरवे कुलूप म्हणजे त्या वेबसाईटचे सर्टिफिकेट. एखाद्या वेबसाईटचे कम्युनिकेशन सुरक्षित आहे हे ते सर्टिफिकेट दर्शवते. हे सर्टिफिकेट (याला SSL/TLS Certificate म्हणतात) म्हणजे त्या त्या वेबसाईटचे ओळखपत्र म्हणता येईल. प्रत्येक संकेतस्थळाला हे ओळखपत्र प्रदान करायचा अधिकार असलेल्या जगमान्य संस्थांना 'सर्टिफिकेट ऑथॉरिटी' म्हणतात, आणि ई-मुद्रा ही अशीच एक संस्था. ती हे ओळखपत्र (सर्टिफिकेट) वितरित करते. हे सर्टिफिकेट वितरित करताना ई-मुद्रा सारख्या संस्थांना एक 'प्रायव्हेट की' (Private key) आवश्यक असते. ही की वापरुन ते वेबसाईटचे सर्टिफिकेट तयार करतात. ही 'की (Key)' गुप्तपणे तयार केली जाते आणि कधीही उघड केली जात नाही. जसे एखाद्या अधिकृत कागदपत्रांवर शिक्का मारला जातो, तो शिक्का पाहून समजते की एखाद्या अधिकृत व्यक्तीने हा कागद तयार केला आहे, त्यावर विश्वास ठेवता येऊ शकतो. तसे ही 'प्रायव्हेट की' काम करते. ही प्रायव्हेट की जोपर्यंत गुप्त आणि मजबूत आहे तोपर्यंतच तिने तयार केलेल्या 'सर्टिफिकेट' वर विश्वास ठेवता येतो. आपण पासवर्ड जसा 'स्ट्रॉंग' हवा म्हणतो तशी ही प्रायव्हेट की 'स्ट्रॉंग' असायला हवी तरच ती उघड होणार नाही. ही की एक प्रोग्राम वापरुन कुणालाही ओळखता येणार नाही अशी ऑटोमॅटिक तयार केलेली असते. आता नेमकं बिघडलं काय? एप्रिल २०२५ मध्ये ई-मुद्राने काही सर्टिफिकेट तयार केले होते. पण ते तयार करणाऱ्या स्क्रिप्टमध्ये चूक झाली आणि ही प्रायव्हेट की अत्यंत कमकुवत तयार झाली. ती की कुणालाही सहज ओळखता येईल अशी. त्यामुळे ही प्रायव्हेट की वापरुन कुणीही खोटे सर्टिफिकेट तयार करू शकेल. हे बनावट सर्टिफिकेट वापरुन तो कुठलीही वेबसाईट सुरक्षित आणि खरी आहे असे दर्शवणे सहज शक्य होते. म्हणजे एखाद्या बँकेच्या नावाने बनवलेल्या खोट्या वेबसाईटवरही ते कुलूप हिरवे दिसले असते आणि त्यातून फसवणूक करता आली असती. पण इथे थोडा दिलासाही आहे. जगातील बहुतांश ब्राऊजरने ह्या प्रायव्हेट की ने तयार केलेली सर्टिफिकेट आधीच ब्लॉक केली आहेत. त्यामुळे आता हे सर्टिफिकेट वापरणाऱ्या वेबसाईट सामान्य ब्राऊजर मध्ये उघडणारच नाहीत. उघडल्या तरी त्यांवर सूचना लिहून येईल. मग धोका उरला कुठे? ब्राउझरच्या बाहेर. आपल्या फोनमधली अनेक ॲप्स, जुनी उपकरणं, कंपन्यांची अंतर्गत सॉफ्टवेअर्स ही सार्वजनिक ब्राऊजर वापरत नाहीत, त्यांची अंतर्गत सर्टिफिकेट वापरण्याची सोय केलेली असते. म्हणूनच गो, पायथन, रस्ट, इलेक्ट्रॉन अशा प्रोग्रॅमिंग जगतातल्या मंडळींनी तातडीने अपडेट्स काढले आहेत. ज्यांच्या संकेतस्थळाचं प्रमाणपत्र ई-मुद्राच्या या रूटवर आधारित आहे, त्यांना ते लगेच बदलावं लागणार आहे, नाहीतर त्यांचं संकेतस्थळ ब्राउझरमध्ये उघडणारच नाही. आपण सामान्य माणसांनी काय करायचं? फार काही नाही. फोन, ब्राउझर आणि ॲप्सचे अपडेट्स 'नंतर करू' म्हणून पुढे ढकलू नका. सार्वजनिक वायफायवर बँकेचे व्यवहार शक्यतो टाळा. आणि एखाद्या वेबसाइटवर ब्राउझरने "हे कनेक्शन सुरक्षित नाही" असा इशारा दिला, तर तो दुर्लक्षित करून पुढे जाऊ नका. तो इशाराच तुम्हाला वाचवत असतो. या प्रकरणातून एकच शिकायला मिळते. सायबर सुरक्षेचे गडकिल्ले मोठमोठ्या भिंतींवर उभे केलेले असतात, पण सुरक्षेचे हे गड कोसळतात ते एका छोट्याशा चुकीमुळे. कुलूप कितीही भक्कम असो, चावीच कमकुवत असेल तर आपलं घर सुरक्षित नसते.
3
34
2
159
11,217
समृद्धीवर कंटेनरला मागून धडकून अपघात होण्याचे प्रकार का होतात याचे उदाहरण. स्पष्ट दिसावे म्हणून दुसरी चित्रफित झूम केलेली आहे. नजीकच्या काळात समृद्धीवर झालेले अपघात हे याच एका मूर्खपणातून झालेले आहेत. समोरची गाडी ओव्हरटेक करत असेल तर हळू चालत असेल, आपण गाडी हळू करून सुरक्षित अंतर राखावे, तिचं ओव्हरटेक पूर्ण झाल्यावर आपण पुढे निघावे. हे असले आर्दाड एक सेकंदही गाडी हळू करण्याच्या मनस्थितीत नसतात आणि मग इतरांचा जीव धोक्यात टाकतात. 120+ या स्पीडवर समोरच्या गाडीला खेटून चालवणारे कित्येक मी पाहिलेत, त्यानंतर हे दुसरे बैलबुद्धी जे अचानक तिसऱ्या लेन मध्ये शिरतात. तुम्ही कितीही सुरक्षित गाडी चालवा, पण हे असले अक्कल गहाण टाकलेले ड्रायव्हर कधी कुणाच्या जीवावर उठतील सांगता येत नाही.
22
28
3
200
55,709
फ्रान्समध्ये एक विचित्र सायबर हल्ला झाला आहे. हॅकर्सनी कुणाचा पासवर्ड चोरला नाही की बँक खाते रिकामे केले नाही... त्यांनी चक्क सुमारे ४५० सुपरमार्केटमधले फ्रिज 'हॅक' केले.! हॅक झाल्यावर हॅकर्सनी इंटरनेटला जोडलेल्या या फ्रिजचे तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत वाढवले. दूध, मांस, फळे, फ्रोजन फूड सगळे खराब झाले. काही ठिकाणी तर आगही लागली. आपण 'सायबर हल्ला' म्हटले की डोळ्यासमोर कॉम्प्युटर, मोबाईल आणि डेटा चोरी येते. हे झाले आयटीचे, म्हणजे माहितीचे जग. पण आणखी एक जग आहे, ओ.टी. (OT Operational Technology), म्हणजे ऑपरेशनल टेक्नॉलॉजी. ही यंत्रणा प्रत्यक्ष भौतिक जगात काम करते. वीज केंद्रातील टर्बाइन, पाणी शुद्धीकरण केंद्रातील पंप, कारखान्यातील मशीन, रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा, कनेक्टेड वाहनं आणि हो, सुपरमार्केटचे फ्रिजसुद्धा. फरक साधा आहे. आयटीवर हल्ला झाला तर 'डेटा' जातो. ओटीवर हल्ला झाला तर वस्तू नासतात, यंत्रे थांबतात आणि कधी कधी माणसांचे जीव धोक्यात येतात. २०१५ मध्ये युक्रेनमध्ये अशाच सायबर हल्ल्याने ऐन डिसेंबरच्या थंडीत सव्वा दोन लाख ग्राहकांची वीज गेली होती. फ्रान्समध्ये संशोधकांना ७,४०० हून अधिक तापमान नियंत्रण यंत्रणा इंटरनेटवर असुरक्षित अवस्थेत सापडल्या होत्या. म्हणजे दार उघडेच होते, कुणीतरी संधि साधून आत येण्याचीच वाट पहायची होती. आपल्याकडेही कारखाने, वीज, पाणी आणि रुग्णालये झपाट्याने 'स्मार्ट' होत आहेत. स्मार्ट होणे चांगलेच आहे. पण सुरक्षित नसलेले स्मार्टपण म्हणजे चोराच्या हातात दिलेली घराची चावी. त्यामुळे सायबर सुरक्षेत या 'ओ.टी. सेक्युरिटी' ला महत्व वाढत आहेत. कारण बहुतेक कारखाने आणि इतर यंत्रणा आजकाल कनेक्टेड होत आहेत. एवढेच काय आपल्या घरगुती वापरातल्या अनेक गोष्टी आज स्मार्ट आणि कनेक्टेड आहेत. त्यांनाही हॅकिंगचा धोका आहेच. आयटी हॅकिंग मुळे डेटा गेला तर एकवेळ बॅकअपमधून परत मिळवता येतो. पण जळालेले गोदाम, निर्मिती थांबलेले ऊर्जा प्रकल्प आणि हॉस्पिटल मध्ये हॅकिंग मुळे गेलेला जीव परत येत नाही.! #सायबरसुरक्षा
11
34
1
187
26,517
गेल्या दोन-तीन वर्षांत मी दक्षिणेतली अनेक मंदिरं फिरलो, आणि त्यांच्या स्थापत्यशैलीच्या प्रेमातच पडलो आहे.! आकाशाला भिडणारी भव्य-दिव्य गोपुरं, भलेमोठे प्रशस्त मंडप, दगडात जिवंत झालेलं कोरीवकाम, नजर पोहोचेल तिथवर पसरलेला मंदिरांचा परिसर... नयन दिपून जातात, त्यांचं वर्णन करायला शब्दही थिटे पडतात. चोळ, पाण्ड्य, विजयनगर आदी साम्राज्यांनी काय संपन्नता, समृद्धी पाहिली असेल..!
5
3
72
2,952
माणसाने प्रवास करत रहावे, प्रवास केल्याने एका वेगळ्या जगाचा उलगडा होत राहतो. दोन दिवस झाले मी चेन्नईत आहे. आणि इथे मलाही काही नवीन गोष्टी कळल्या, ज्या कदाचित इथे आलो नसतो तर कधी उलगडल्या नसत्या. चेन्नईचा जुना भाग आहे, Mylapore. इथल्या प्रसिद्ध कपालेश्वर मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या बाजारात 'गोलू बोम्मई' पाहिले. आपल्या पुराणांतील देवी देवता, पुराणांतील दृश्ये चित्रित करणाऱ्या मातीच्या मूर्ती. आपण गणपती मध्ये करतो तसे इथे नवरात्रीत या मूर्ती पायऱ्यांवर एकावर एक रचून त्यांची आरास मांडली जाते अशी इथली प्रथा. इथली ही परंपरा नव्यानेच माहित झाली. त्या सुंदर आखीव रेखीव मूर्ती, काही रामायण, महाभारतातील दृश्ये, कुठे श्रीकृष्ण, कुठे गणपती, शंकराचार्य, दक्षिणेतील संत अशा रंगीबेरंगी सुंदर सुबक मूर्तींनी संपूर्ण बाजार सजला होता. दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाच्या तयारीत सगळा बाजार नवख्या तरुणीसारखा हळू हळू सजू लागला होता. मातीच्या त्या बाहुल्यांकडे पाहताना एक गंमत जाणवली. भाषा वेगळी, पेहराव वेगळा, सण साजरा करण्याची पद्धत वेगळी, पण त्या मूर्तींमधला राम तोच, कृष्ण तोच आणि गणपतीही तोच! आपल्याकडे जो बाप्पा दहा दिवसांसाठी घरी येतो, तोच इथे नवरात्रीच्या पायरीवर बसून गालातल्या गालात हसत असतो. ताट वेगळं, पण नैवेद्य तोच. आपल्या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात अगणित रंग आहेत, आणि हे रंग त्या भूमीत प्रत्यक्ष पाय ठेवल्यावरच उलगडतात. पुस्तकातला भारत म्हणजे मिटलेली कळी, प्रवासात ती फुलासारखी उमलते आणि तिचा सुगंध फक्त तिथे पोहोचलेल्यालाच येतो. म्हणूनच मला प्रवास करायला आवडतो.! केल्याने देशाटन, पंडितमैत्री, सभेत संचार, शास्त्रग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार...
2
10
131
5,207
इंग्रजीच्या प्रभावामुळे साधे सोपे नेहमीच्या वापरातले मराठी शब्द आपण विसरत चाललो आहेत. किती वाजलेत या दोन सोप्या शब्दांची जागा "टाईम" काय झाला ने कधी घेतली कळलंच नाही. आठवड्याचे वार आता सोमवार, मंगळवार नसतात तर मंडे, ट्युजडे... तुमच्या वापरात असे कोणते साधे मराठी शब्द आहेत ज्यांची जागा आता इंग्रजी शब्दांनी घेतली आहे.
10
45
3,517
आता एसबीआयने बँका बंद राहणार नाहीत म्हणून वेगळे मेसेज करू नयेत म्हणजे झालं. 'बँका सुरू आहेत, एकदा नक्की याच ' इतका आग्रह तर सासुरवाडीचे लोकही करत नाहीत जितका एसबीआयने केला आहे.
एसबीआय मला फक्त स्वप्नात प्रकट होऊन, दृष्टांत वगैरे देऊन सांगायची बाकी होती की आज बँका चालू आहेत...
1
1
12
570
एसबीआय मला फक्त स्वप्नात प्रकट होऊन, दृष्टांत वगैरे देऊन सांगायची बाकी होती की आज बँका चालू आहेत...
1
1
1
9
1,105
माणसाला समोसे थंड झालेले आवडत नाही, आणि कढईतून गरमगरम काढलेले खाता येत नाही. आपल्या मनाचे चोचले फार विचित्र आहेत. हे आवडत नाही, ते जमत नाही, असं नको, तसंच पाहिजे वगैरे वगैरे...
1
1
39
696
काल शेगडीच्या जाळ्या काढून, शेगडी उचलून त्याखाली पाणी फिरवून सगळं सांडलेलं दूध जेव्हा स्वच्छ करावं लागलं, तेव्हा समजलं, दूध उतू गेल्यावर आई ओरडायची का ते... उगाच नाही घरातल्या आई, धावत जाऊन दुधाचा गॅस बंद करत.... विषय दुधाचा नाहीच आहे खरं तर...
5
1
83
3,707
एक्स काय किंवा कुठलाही सोशल मिडिया तुम्हाला वापरायचा असेल तर एक अस्त्र कायम जवळ बाळगून रहा, "दुर्लक्ष" इथल्या काही गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करायला शिकलो की आपोआप इथला प्रवास सुखाचा होतो... इथे येऊन सुखी समाधानी राहण्याचा हा कानमंत्र आहे...
2
8
35
686
मराठवाडा मुक्तिसंग्राम - लेख ५ - ऑपरेशन पोलोच्या नोंदवहीतली अल्पज्ञात पानं - समारोप मराठवाडा मुक्तिसंग्रामाची गोष्ट सांगताना आपण नेहमी १३ ते १७ सप्टेंबर या पाच दिवसांवर थांबतो. पण या पाच दिवसांच्या नोंदवहीत काही अशी पानं आहेत, ज्याची फारशी चर्चा होत नाही. अशा काही पानांची नोंद आज आपण घेऊया. ऑपरेशन पोलोच्या आधी केलेले ऑपेरेशन कबड्डी ऑपरेशन पोलो सुरू होण्याआधी सरहद्दीवर एक वेगळीच कारवाई चालू होती. निजामी हद्दीतून हैदराबादचे सैन्य आणि रझाकार भारतीय हद्दीत घुसून हल्ले आणि लुटमार करत होते. त्यांचा बंदोबस्त करावा आणि सीमांचे रक्षण करावे या हेतूने भारतीय लष्कराला असा आदेश देण्यात आला होता की जिथून हल्ले होतात तिथपर्यंत जावे, मुळावर आघात करावा आणि परत यावे. या कारवाईला लष्कराने जे नाव दिले, ऑपरेशन कबड्डी. सैन्य लहान लहान तुकड्यांत विभागून, गरज पडल्यास सरहद्द ओलांडून पुन्हा परत यायचे, आणि म्हणूनच या संपूर्ण कारवाईला तुकडीने 'कबड्डी' असे सांकेतिक नाव दिले. पुढे प्रत्यक्ष कारवाईचे नाव ठरले ऑपरेशन पोलो, आणि ती संपल्यानंतर तिचा उल्लेख 'कॅटरपिलर' या नावाने केला गेला. "मी तुम्हाला पोलीस पाठवू शकत नाही, पण वीस रझाकार पाठवतोय" रझाकार ही केवळ एक खाजगी संघटना असून सरकारचा तिच्याशी काडीचाही संबंध नाही, असा आभास हैदराबाद प्रशासनाकडून निर्माण केला जात होता. परंतु, भारतीय सैन्याच्या हाती लागलेल्या एका डी.एस.पी.च्या पत्राने या लबाडीचा बुरखा पार फाडून टाकला. "I can send you no policemen but I am sending you 20 Razakars" हे पत्रातील वाक्य म्हणजे निजामी शासन, पोलीस यंत्रणा आणि हिंसक रझाकार यांच्यातील अभद्र युतीचे उघडेनागडे वास्तव वेशीवर टांगणारी जिवंत साक्ष होती. निजामाची खरी ताकद किती होती? ऑपरेशन पोलोचे प्रमुख जनरल चौधरींनी हैदराबादच्या लष्करी ताकदीची यादी दिली आहे. नियमित सैन्य बावीस हजार, अनियमित तुकड्या दहा हजार, सशस्त्र अरब दहा हजार, पैगा फौजा आणि सशस्त्र पोलीस मिळून दहा हजार, आणि रझाकार दोन लाख. यात आणखी एक भर होती. ऑस्ट्रेलियन हस्तक सिडने कॉटन कडून निजामाने बरीच शस्त्रे आणि दारूगोळा मिळवला होता. त्या यादीत हजार रणगाडाविरोधी सुरुंग, दोन आणि तीन इंची मोर्टार, अडीच हजार बॉम्ब, ब्राउनिंगचा पाच हजार दारूगोळा, पाचशे स्फोटक गोळे, दोन विमानविरोधी तोफा आणि सहा रणगाडाविरोधी तोफा यांचा समावेश होता. भारतीय बाजूनेही तयारी तशीच होती. लष्कराची विभागणी पाच गटांत करण्यात आली होती, ज्यांची नावे होती स्ट्राईक फोर्स, स्मॅश फोर्स, किल फोर्स, वीर फोर्स आणि रिअर फोर्स. एका संस्थानाला संपवायला दुसऱ्या संस्थानांच्या फौजा आपला असा एक समज असतो की ऑपरेशन पोलोची संपूर्ण कारवाई केवळ भारतीय लष्करानेच पार पाडली. परंतु, या मोहिमेत विविध संस्थानांच्या सैन्यांनी देखील थेट भाग घेतला होता. रणांगणावर प्रत्यक्ष उतरलेल्या फौजांमध्ये ग्वाल्हेर लान्सर्स, म्हैसूर लान्सर्स, मेवाड इन्फंट्री, ग्वाल्हेर इन्फंट्री, म्हैसूर इन्फंट्री आणि कोल्हापूरची राजाराम रायफल्स यांचा सहभाग होता. याशिवाय, बडोदा इन्फंट्री, त्रावणकोर इन्फंट्री आणि जोधपूर इन्फंट्री या तुकड्यांनी अप्रत्यक्षरीत्या मोलाचे सहकार्य केले होते. थोडक्यात सांगायचे तर, एका संस्थानातील जुलमी राजवटीचा अंत करण्यासाठी इतर अनेक संस्थानांची सैन्ये एकत्र येऊन लढली होती. भूमिगत चळवळीचे स्वतःचे युद्धयंत्र स्टेट काँग्रेसच्या कृती-समितीला लष्करी कारवाईची पूर्वकल्पना होती. संपूर्ण संस्थानाचे 'ॲक्शन इनचार्ज' डॉ. मेलकोटे यांनी ३१ जुलै १९४८ रोजी confidential circular no. 13 द्वारे निवडक कार्यकर्त्यांची शिस्तबद्ध युनिट्स उभारण्याचे निर्देश दिले. यानुसार औरंगाबाद (मध्यप्रांत) ५०, नांदेड व परभणी प्रत्येकी १२५, मुंबई सरहद्दीवरील औरंगाबाद व बीड प्रत्येकी ७०, अंबेजोगाई ४० आणि उस्मानाबादसाठी १५० कार्यकर्ते निश्चित केले गेले. वाढत्या अत्याचारांपासून संरक्षणासाठी प्रत्येक जिल्हा केंद्राला त्वरित १,००० हातबॉम्ब पाठवण्याचे सांगण्यात आले. पुढील परिपत्रकात या कार्यकर्त्यांना हेरगिरी, हल्ले, पोलिसिंग व पेट्रोलिंगचे प्रशिक्षण देण्याची सोय केल्याचे कळवले गेले. या ऑपरेशन पोलोची तयारी केवळ भारतीय सैन्याकडूनच नव्हे तर अंतर्गत स्टेट काँग्रेस आणि लढ्यात इतर सहभागी सर्वांनीच चालवली होती. औरंगाबादच्या प्राध्यापक इब्राहीम आणि त्याचा वेडगळपणा १५ सप्टेंबर १९४८ रोजी भारतीय लष्कराने औरंगाबाद शहरावर कब्जा केला. त्याच दिवशी या शहरात एक विलक्षण आणि अस्वस्थ करणारा प्रसंग घडला. भारतीय सैन्य औरंगाबादेत आले असताना, रझाकारांनी शरणागतीचा पांढरा ध्वज दाखवून त्यांना जाळ्यात अडकवण्याचा कट रचला, पण सैन्याने तो उधळून लावला. यानंतर, औरंगाबादच्या इंटरमीजिएट कॉलेजमधील इतिहासाचा प्राध्यापक इब्राहीम याने विद्यार्थ्यांच्या हातात भाले देऊन त्यांना भारतीय रणगाड्यांसमोर उभे केले. समोर भारतीय सैन्याचे रणगाडे असताना हातात भाले आणि दगड घेऊन लढण्याची तयारी म्हणजे निव्वळ वेडगळपणा होता. भारतीय अधिकाऱ्याने मुलांना परिस्थिती समजावून सांगून जीव वाचवण्याचा सल्ला दिला. यानंतर बहुतांश मुले पळून गेली, तर काही पुढे गेली. विद्यार्थ्यांना मृत्यूच्या तोंडी ढकलणारा प्राध्यापक इब्राहीम स्वतः पळून जाताना पकडला गेला. खोट्या बातम्यांच्या आडून दाखवलेला लष्करी पोकळपणा नळदुर्गच्या घटनेत उल्लेखलेल्या दिवशी, १४ सप्टेंबरच्या सकाळी उमरग्याहून कूच करणाऱ्या सैनिकी तुकडीला जनरल चौधरींचा तातडीचा निरोप मिळाला, “कुठेही न थांबता वेगाने पुढे चालत राहा! यामागील पार्श्वभूमी नंतर स्पष्ट झाली. जनरल चौधरींनी हैदराबाद रेडिओवरील बातमी ऐकली होती; त्यात दावा केला गेला होता की, "आम्ही जोरदार प्रतिकार केला, परंतु शेवटी आम्हाला 'तळमूड' सोडावे लागले आणि त्यावर भारतीय सैन्याने ताबा मिळवला." वास्तविक पाहता तेव्हा भारतीय सैन्याने तळमूड घेतलेलेच नव्हते. मात्र, या खोट्या बातमीमुळे भारतीय सैन्याला तात्काळ ती परिस्थिती प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळाली. स्वतःच्याच खोट्या प्रसिद्धीच्या जाळ्यात अडकून निजामी सैन्य आतून कसे ढासळले, याचे हे एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे. १३ सप्टेंबर १९४८ रोजी पहाटे चार वाजता सुरू झालेली ही वादळी कारवाई १७ सप्टेंबरच्या सायंकाळी ५ वाजता निजामाच्या औपचारिक शरणागतीने शमली. शेकडो वर्षांची जुलमी घराणेशाही आणि अढळ वाटणारा असफशाहीचा तख्त अवघ्या १०९ तासांत पत्त्यांच्या बंगल्यासारखा पुरता कोसळला. अथांग संपत्ती, अनियंत्रित सत्ता आणि रझाकारांच्या हिंसक ताकदीच्या अहंकारावर उभा असलेला निजामाचा साम्राज्यदुर्ग अखेर भारतीय सैन्याच्या निग्रहापुढे धुळीस मिळाला. ज्या हैदराबाद संस्थानाचा सूर्य कधी मावळणार नाही असे निजाम समाजात होता, त्या जुलमी राजवटीचा अस्त मराठवाड्याच्या स्वातंत्र्यसंग्रामातील बलिदानाने घडवून आणला. इतिहासाच्या पुस्तकांत केवळ विजय आणि तारखांची नोंद उरते; पण एका लढ्याचे खरे मोल त्याच्या नैतिक चारित्र्यात असते. सामाजिक चळवळीतून होत गेलेली जनजागृती, हळू हळू उभा राहिलेला लढा, अनेक लहान मोठ्या लढाया, सत्याग्रहांची मालिका, अनेकांना आलेले हौतात्म्य, शेवटाला घडत आलेला प्रचंड रक्तपात, या सर्व पानांतूनच असफशाहीच्या राखेतून स्वतंत्र भारताच्या लोकशाहीची नवी पहाट उगवली. मराठवाडा मुक्तिसंग्रामाची धगधगती गाथा सांगताना इतिहास नेहमी १३ ते १७ सप्टेंबर या केवळ १०९ तासांच्या वादळी पटावर येऊन स्थिरावतो. पण विजयी आरोळ्या आणि तारखांच्या गर्दीमागे या रक्तरंजित संघर्षाची अशी अनेक धुळीने माखलेली पानं दडली आहेत, ज्यांवरचा काळोख अजून पूर्णपणे हटलेला नाही. निजामाची दडपशाही, रझाकारांचा नंगानाच आणि स्वातंत्र्यासाठी पेटून उठलेला मराठवाडा या संपूर्ण प्रवासाच्या नोंदवहीत अशी कित्येक मौन दालनं आहेत, जी आज पुन्हा एकदा उघडून पाहण्याची गरज आहे. याच काही अल्पप्रचलित पानांचा उलगडा करण्याचा माझा प्रयत्न या लेखमालिकेतून मी केला. मी आपल्यापर्यंत नवीन माहिती पोचवू शकलो असेल मी मानतो. धन्यवाद. विराम – आशुतोष संदर्भ: हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा, अनंत भालेराव
8
15
480